This is Abhijit Ranaware's personal blog. You can share anything with me here.

Wednesday, September 10, 2008

कॉफीशॉप - "फर्स्ट फॅमिली'

शंकर-पार्वतीचं विमान नेहमीप्रमाणं आकाशातून चाललं होतं. पुण्यावरून जाताना शंकरांना धक्काच बसला. चिंतातुर होऊन ते म्हणाले, ""अरे, पुण्यनगरीत भूकंप तर झाला नाही ना? आपलं बाळ तिकडं गेलंय सध्या. मला काळजी वाटतेय...'' ......
शंकरांचा पायलट नंदी म्हणाला, ""नाही साहेब, पुण्यात सध्या एक मोठी स्पर्धा होणार आहे, त्याची तयारी चाललीय... म्हणून वरून असं दिसतंय. तुम्ही काळजी करू नका... होईल सगळं व्यवस्थित...''
शंकर म्हणाले, ""अरे, पण एवढं?''
नंदी म्हणाला, ""त्याचं काय आहे साहेब, आमचे गुरुजी सांगत, की फळा जेवढा काळा, तेवढा खडू चांगला उमटतो...''

नंदीचं हे बोलणं भोळ्या शंकरांना काही उमगलं नाही. ते विचारमग्न झालेले पाहून नंदीनं हळूच "पार्वतीच्या बाळा' ही सीडी लावली. ते कव्हर पाहून साहेब भडकले. ""हे सीडीवालेसुद्धा कधी "शंकराच्या बाळा' नावानं सीडी काढणार नाहीत. कायम यांचंच नाव...''
पार्वती मग हसून म्हणाल्या, ""हे घ्या तुमच्यासाठी...'' पार्वतीनं "शंकर महादेवन'ची सीडी दिलेली पाहून शंकर खूष झाले. तीच सीडी लावण्याचा आदेश त्यांनी नंदीला दिला; पण सीडी सुरू करताच "गणदेवताय, गणाधीशाय, गौरीपुत्राय धीमहि' ऐकू यायला लागल्यावर सांबशिवाचा पारा पुन्हा चढला.
""बंद कर... बंद कर आधी ते!'' असं ते ओरडले. शेवटी नंदीनं सीडी बंद केली. शांततेतच प्रवास सुरू झाला. दोघांचीही दोन-तीन दिवसांपासून चिडचिड होत होती, हे नंदी बघत होता. दोघंही आपल्या लाडक्‍या पोराला "मिस' करीत होते. नंदीलाही करमत नव्हतं. उगाच काही तरी "पीजे' टाकून तो मन रमवण्याचा प्रयत्न करीत होता.

शेवटी शंकर बोलले, ""खरं तर हल्लीच्या काळात त्याला पृथ्वीवर जाऊ द्यायलाच नकोय. पण केवळ लोकांच्या प्रेमाखातर हा निघतो आणि आपल्यालाही त्याचं मन मोडवत नाही. परवाच कान दुखताहेत, म्हणत होता. अश्‍विनीकुमारांकडं दाखवायला नेईन म्हणेपर्यंत त्याची जायची वेळही आली. या वेळी दुखापत आणखी चिघळू नये म्हणजे झालं. शिवाय हल्ली हे केवळ आवाजाचं प्रदूषण नाही; तर हवेतलंही प्रदूषण किती वाढलंय! याचं नाक हे एवढं मोठ्ठं असूनही श्‍वास घ्यायला अपुरं पडत असेल. गुदमरत असेल बाळ माझं...''

बाबांचा गदगदलेला स्वर ऐकून आईलाही गहिवरून आलं. ती म्हणाली, ""काही काळजी करू नका. अहो, आता आपला मुलगा मोठा झालाय. त्याला कळतं सगळं. गण कसे सांभाळायचे, हे तुमच्यापेक्षा त्याला छान समजतं. त्याच्या नुसत्या तिथं जाण्यानंच अनेकांच्या बुद्धीत चांगला बदल घडतो. वाईट त्यागून, जो तो चांगला विचार करू लागतो. त्याच्या येण्यासाठी म्हणून तर केवढी वाट पाहत असतात सगळे!...''
तेवढ्यात नंदीला काहीतरी आठवलं. त्यानं लॅपटॉप चालू करून "इनबॉक्‍स' उघडला. त्याच्या "मेल'वर गणेशाच्या स्वागताचे छान छान फोटो पडले होते. ते पाहून आई-बाबा, दोघंही प्रसन्न झाले. नंदीला म्हणाले, ""घ्या विमान कैलासाकडं... आता त्याची काही काळजी नाही...''

- मामू (सप्तरंग - सकाळ)

No comments: