This is Abhijit Ranaware's personal blog. You can share anything with me here.

Monday, September 22, 2008

मागोवा जी. डी. बिर्ला यांच्या व्यक्तिमत्त्वाचा

घनश्‍यामदास तथा जी. डी. बिर्ला (१८९४-१९८३) हे भारतीय उद्योगजगतातील एक प्रमुख नाव. या क्षेत्रातील कार्याबरोबरच इतर अनेक क्षेत्रांत देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा वेध सिंगापूरस्थित भारतीय अभ्यासक मेधा कुदैस्या यांनी बिर्ला यांच्या चरित्राच्या माध्यमातून घेतला आहे.
बिर्ला यांचे कुटुंब हे मुळात व्यापार करणारे घराणे नव्हते. आजोबा शिवनारायण यांनी १८५० च्या दशकात मुंबईस स्थलांतर करून व्यवसायात प्रवेश केला आणि लवकरच अफूच्या व्यापारात आपला जम बसवला. बाराव्या वर्षी आपले वडील बलदेवदास यांच्या हाताखाली मुंबईत व्यवसायात भाग घ्यायला सुरवात केली आणि लवकरच कलकत्त्याला स्थायिक झाले. १९१० मध्ये शिवनारायण यांचे निधन झाले आणि लगेचच बलदेवदास यांनी व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली. बिर्ला कुटुंबाच्या वाढत्या व्यवसायाची जबाबदारी घनश्‍यामदास; तसेच त्यांचे दोन थोरले बंधू जुगलकिशोर आणि रामेश्‍वरदास यांच्यावर पडली. वयाने लहान असले, तरी कालांतराने कुटुंबाच्या व्यवसायातील प्रमुख व्यक्ती म्हणून घनश्‍यामदास ओळखले जाऊ लागले.

लवकरच त्यांनी कलकत्त्याच्या मारवाडी समाजातील तरुण पिढीतील प्रमुख कार्यकर्ते म्हणून आपले स्थान निर्माण केले. समाजाच्या अनेक संघटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्या काळात बिर्ला आणि त्याच्या सहकाऱ्याचा बंगालमधील क्रांतिकारकांच्या चळवळीशी संबंध आला. एका कटात त्यांचे नाव उघड झाले आणि त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्यामुळे त्यांना काही दिवस अज्ञातवासात घालवावे लागले. त्याच्याचमुळे कदाचित त्यांनी एका मर्यादेपलीकडे सरकारच्या विरोधात जाणे आणि सनदशीर कारवाया सोडणे धोकादायक आहे, असे ठरविले. ही खबरदारी त्यांनी आयुष्यभर पाळली. याच काळात त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत "जूट' (ताग) कारखान्याच्या व्यवसायात इंग्रज कारखानदारांची मक्तेदारी मोडून काढली.

एकूण सार्वजनिक जीवन आणि राजकारणात बिर्ला यांच्यावर चार-तीन व्यक्तींचा प्रभाव पडला. त्या म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी. बिर्ला कुटुंबीयांनी, प्रामुख्याने बनारस हिंदू विद्यापीठाला भरघोस मदत केली. मालवीय आणि लाला लजपत राय यांच्या आग्रहामुळे बिर्ला यांनी १९२६ मध्ये तत्कालीन केंद्रीय कायदे मंडळाची निवडणूक लढविली. १९३० च्या दशकात त्यांच्यावर गांधींचा प्रभाव वाढत गेला. वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांशी संबंध वाढत गेला. सरदार पटेलांशी त्यांचे विशेष सख्य होते, तर पंडित नेहरूंशी मात्र त्यांचे फारसे जमल्याचे दिसत नाही. याच काळात भारतीय उद्योगपतींची अखिल भारतीय शिखर संस्था असावी, यासाठी पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या सहकाराने प्रयत्न केले. त्यामुळेच बिर्ला हे भारतीय उद्योगजगताचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. याच काळात त्यांनी कॉंग्रेस आणि ब्रिटिश सरकार यांच्यादरम्यान अनेक प्रसंगी मध्यस्थाची कामगिरी पार पाडली.

स्वातंत्र्यानंतर सरकारच्या समाजवाद-नियोजनाच्या धोरणावर त्यांनी जशी टीका केली; तसेच प्रमुख नेत्यांशी वैयक्तिक संबंध ठेवत ही धोरणे बोथट करण्यासाठी खटपट केली. अर्थात, या धोरणाचा बिर्लासमूहाच्या वाढीवर कोणताच परिणाम झाला नाही. सरकारशी उघड संघर्षापेक्षा पडद्यामागच्या हालचालींवर भर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरण त्यांनी याही काळात सुरू ठेवले. कॉंग्रेस पक्षाला त्यांनी नेहमीच भरघोस मदत केली. एवढेच नव्हे, तर उद्योगजगताकडून पक्षाला पैसे मिळत राहतील यासाठी प्रयत्न केले. याचे सविस्तर तपशील चरित्रात वाचायला मिळतात. भारतासारख्या देशाला कॉंग्रेससारखा मध्यमवर्गी पक्षच उपयुक्त आहे, अशी त्यांची धारणा होती. पिलानीचे बिर्ला अभियांत्रिकी महाविद्यालय हे त्यांचे शिक्षणक्षेत्रातील प्रमुख योगदान आहे.


अभय दातार - सकाळ

No comments: